।। गोदावरी आरती ।।

श्री आरती गोदावरी । उगमस्थ ब्रह्मगिरी । कुशावर्त गंगाद्वारी । माता श्री त्र्यंबकेश्वरी ।।१।। धृ॰
śrī āratī godāvarī | ugamastha brahmagirī | kuśāvarta gaṃgādvārī | mātā śrī tryaṃbakeśvarī ||1||

पुण्यसलीला ‘गोदामाई’, ‘श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर’ येथे, ‘ब्रह्मगिरी’ पर्वतावर उगम पावते. आपल्या उगमस्थानापासून भूगर्भमार्गाने ‘गंगाद्वार’ आणि पुढे ‘कुशावर्त’ कुंडात प्रकट होते. ।।१।।

जय पतित पावनी । निवृत्ति नाथाचरणी । गौतम श्री जटाधारी । वरदात्री गोदावरी ।।२।।
jaya patita pāvanī | nivṛtti nāthācaraṇī | gaautama śrī jaṭādhārī | varadātrī godāvarī ||2||

एका आख्यायिकेनुसार, गोहत्त्यापतित ‘श्री गौतम ऋषीं’च्या पापनिवारणार्थ ‘श्री शंकर भगवान’ ज्या ठिकाणी आपल्या जटा आपटतात ते गोदावरीचे उगमस्थान. पुढे ‘गौतम ऋषी’ कुशांचा बांध घालून गोदावरीचे पाणी कुंडात आडवतात ते ‘कुशावर्त’ होय, जिथे गोदावरी जणू ‘संत श्री निवृत्तीनाथ’ यांना चरणस्पर्श करते आहे. पतितांना पावन करणारी, वरदात्री गोदावरी अशा श्रद्धेने भाविक गोदावरी पात्रांत स्नान करतात. ।।२।।

जय अमृत वाहिनी । वरदा माता अंजनी । वंदन श्री रामभूमी । कुंभपात्री गोदावरी ।।३।।
jaya amṛta vāhinī | varadā mātā aṃjanī | vaṃdana śrī rāmabhūmī | kuṃbhapātrī godāvarī ||3||

‘अंजनीमाते’चा निवास व ‘श्री हनुमान’ यांचे जन्मस्थान ‘अंजनेरी’ पर्वत, जणू गोदावरीला आशिष देत असून, वनवास काळात प्रभु श्रीराम यांचे निवास ‘पंचवटी’ भूमीला, गोदावरी जणू वंदन करते आहे. पुराणांतील आख्यायिकेनुसार, ‘सागरमंथना’तून प्राप्त ‘अमृतकुंभ’ रत्नांतील अमृत थेंब, ‘रामकुंड-श्रीक्षेत्र नाशिक’ व ‘कुशावर्त-श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर’ येथे पडले, म्हणून अमृतवाहिनी गोदावरी पात्रांतील या तीर्थक्षेत्रांत दर १२ वर्षांनी “सिंहस्थ कुंभमेळा” भरतो. ।।३।।

जय जीवन दायिनी । गोवर्धन जनस्थानी । नाथसागरा पैठणी । जलदात्री गोदावरी ।।४।।
jaya jīvana dāyinī | govardhana janasthānī | nāthasāgarā paaiṭhaṇī | jaladātrī godāvarī ||4||

‘श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर’ येथून प्रवाहित जीवन दायिनी, जलदात्री गोदावरी मनोहर नागमोडी वळणं घेत-घेत, ‘श्रीक्षेत्र नाशिक’ (‘जनस्थान’) येथे ‘गंगापुर’ (‘गोवर्धन’) धरण आणि पुढे ‘श्रीक्षेत्र पैठण’ (‘प्रतिष्ठान’) येथे ‘जायकवाडी’ (‘नाथसागर’) धरणामध्ये स्थिरावल्यामुळे सभोवतालचा परिसर सुजलाम्-सुफलाम् झाला आहे. ।।४।।

जय गंगाश्री दक्षिणी । अनुबन्ध पंचक्षेत्री । संगम श्री राजमुंद्री । सुखदात्री गोदावरी ।।५।।
jaya gaṃgāśrī dakṣiṇī | anubandha paṃcakṣetrī | saṃgama śrī rājamuṃdrī | sukhadātrī godāvarī ||5||

‘दक्षिणगंगा’ अशी ख्याति असलेल्या सुखदात्री माता गोदावरीचा प्रवास सह्याद्रीच्या कुशीत पश्चिम घाटांत १,०६७ मीटर उंचीवर सुरू होऊन, पुढे ती ‘दख्खन’च्या पठारावरून साधारणत: ‘आग्नेय’ दिशेने, ‘महाराष्ट्र’, ‘छत्तीसगढ’, ‘ओडिशा’, ‘तेलंगणा’ आणि ‘आंध्रप्रदेश’ या पांच राज्यांतून होत-होत, शेवटी आंध्रप्रदेशांतील ‘राजमहेंद्री’ (राजमुंद्री) येथे बंगालच्या उपसागरास संगम पावते. ।।५।।

तुल्या वसिष्ठा गौतमी । श्रीभारद्वाजी आत्रेयी । कौशिकी वृद्धगौतमी । धारासप्त गोदावरी ।।६।।
tulyā vasiṣṭhā gaautamī | śrībhāradvājī ātreyī | kaauśikī vṛddhagaautamī | dhārāsapta godāvarī ||6||

“सप्तगोदावरी स्नात्वा नियतो नियताशन:। महापुण्यमप्राप्नोति देवलोके च गच्छति॥” या श्लोकानुसार पुराणांत वर्णन केलेल्या, माता गोदावरी च्या महापुण्यप्राप्तिकारक सप्त धारा - ‘तुल्या’, ‘वसिष्ठा’, ‘गौतमी’, ‘कौशिकी’, ‘आत्रेयी’, ‘भारद्वाजी’ आणि ‘वृद्धगौतमी’ या नांवाने प्रसिद्ध आहेत. १,४६५ किलोमीटर लांबी असलेल्या गोदावरी नदी पात्रांत एकूण साडेतीन कोटी तीर्थं असल्याचे मानले जाते, त्यामुळे भाविक श्रद्धेने ‘गोदावरी-परिक्रमा’ करतात. ।।६।।

रचना :- श्री. सुनिल शिवाजी खांडबहाले. (नाशिक, रवि, १० नोव्हें. २०१९, म. पू. ३.३० वा.)
#godavariaarti | GodavariAarti.org"गोदावरी आरती" उपक्रम काय आहे?

वैज्ञानिक संशोधनानुसार मानव शरीरात साधारणतः ७०% पाणी आहे, म्हणजे काय? तर गोदावरीच तुमच्या-आमच्या शरीरात नित्य वास करते आहे! नळांद्वारे घराघरांत पोहोचलेली माता गोदावरी केवळ शरीरांतच नाही, तर आपल्या मनांत संचारली पाहिजे. अन्नाशिवाय मानव तीस दिवसही जगू शकेल, परंतु पाण्याशिवाय? तीन दिवसदेखील कठीण! पाणी म्हणजे जीवन. आई 'जन्म' देते, तर नदी 'जीवन' देते. या अर्थाने - "माता गोदावरी आपली आईच आहे." “जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी”.

चला तर मग, जीवनदायी माता गोदावरीचे पावित्र्य जपण्यासाठी, तिचे संवर्धन करण्यासाठी, आपण सुजाण-जागरूक नागरिक या नात्याने, येणाऱ्या नवीन पिढीसाठी "माता गोदावरी" हा एक नवीन संस्कार पेरूयात. साहित्य, संगीत, तंत्रज्ञान आणि लोकसहभाग या माध्यमांतून आपण सर्व जण मिळून माता गोदावरीचा घराघरातून जागर करूयात, माता गोदावरीचे भौगोलिक, पौराणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक तसेच व्यावहारिक महत्त्व गाऊयांत, माता गोदावरीची मनोभावे शब्दसंगीत-पूजा करूयांत, नित्य-आरती करूयांत, "गोदावरी आरती" या उपक्रमांत कर्तव्यबुद्धीने सहभागी होऊयांत.


"गोदावरी आरती" उपक्रमात का सहभागी व्हावे?

"गोदावरी आरती" हे एक साहित्यिक कलात्मक तंत्रज्ञानात्मक शैक्षणिक सांस्कृतिक संस्कारक्षम व्यासपीठ आहे.

 • साहित्यिक दृष्टीने विचार करता - पद्य निर्मिती, संस्कृतप्रचुर शब्द, भाषा रचना, व्याकरण तसेच छंद, वृत्त यांचा अभ्यास होतो.
 • सांगितिक दृष्टीने विचार करता - ताल, सूर, लय, ठेका, वाद्य, गायनपट्टी, माईक / कॅमेरा समज तसेच कराओके यांचा अभ्यास होतो.
 • तांत्रिक दृष्टीने विचार करता - वेबसाईट उघडणे, रेकॉर्ड करणे, अपलोड, डाउनलोड, हॅशटॅग, शेअर करणे यासारखी कौशल्यं विकसित होतात.
 • नवकल्पकता दृष्टीने विचार करता - मोटर कौशल्य (हात-डोळे सुसूत्रता), आत्मविश्वास, एकाग्रता, संघ-भावना वाढीस लागते आणि नवनिर्मितीचा आनंद होतो.
 • गोदावरी नदीचा उगम, संगम, उंची, लांबी, परिसर, पाच राज्यांतील तिचा प्रवास, विविध आख्यायिका, धरणं, तीर्थक्षेत्रें, तिची नांवें यांविषयीचे सामान्यज्ञान प्राप्त होते.
 • आणि सर्वात महत्वाचे म्हणजे - माता गोदावरीचे पाणी आपण रोज प्राशन करतो, वापरतो. त्यामुळे माता गोदावरीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची हि एक अनोखी संधी आहे.

 • "गोदावरी आरती" उपक्रमात कोणास सहभागी होता येईल?

  "गोदावरी आरती" उपक्रमात खाजगी तसेच सरकारी संस्था, शाळा, संगीत/कला-प्रशिक्षण-संस्था, विद्यार्थी, शिक्षक, पालक, गायक, वादक, नर्तक, चित्रकार व अन्य व्यावसायिक कलावंत अर्थातच प्रत्येक नागरिकांस आपल्या कला सादरीकरणासह सहभाग घेता येईल.


  "गोदावरी आरती" उपक्रमात कसे सहभागी होता येईल?

  गोदावरी आरती या व्यापक उपक्रमांतर्गत खालील विविध उपक्रम आयोजित केले गेलेले आहेत, त्यांपैकीं कोणत्याही उपक्रमांत तुम्हांस सहभागी होता येईल. तुमच्या स्वयंस्फूर्त योगदानाबद्दल "गोदावरी आरती" सहभाग प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात प्रदान करण्यात येईल.


  गोदावरी आरती" उपक्रमांतर्गत किमान १ लक्ष लोकसहभागाचे उद्दिष्ट आहे. कृपया, यात आपण सक्रिय सहभागी व्हावे आणि "गोदावरी आरती" हा अभिनव उपक्रम #godavariaarti हॅशटॅगसह अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवून योगदान करावे अशी नम्र विनंती. धन्यवाद!


  मुखपृष्ठ [Home] | गायन-वादन-नर्तन [Singing-Playing-Dancing] | पुस्तिका [Booklet] | हस्ताक्षर [Handwriting] | प्रश्नमंजुषा [quiz] | व्हिडीओ निर्मिती [Video Making] | नवकल्पना [Innovations] | Terms | Policy | Contact