“गोदावरी आरती” उपक्रम काय आहे?

वैज्ञानिक संशोधनानुसार मानव शरीरात साधारणतः ७०% पाणी आहे, म्हणजे काय? तर गोदावरीच तुमच्या-आमच्या शरीरात नित्य वास करते आहे! नळांद्वारे घराघरांत पोहोचलेली माता गोदावरी केवळ शरीरांतच नाही, तर आपल्या मनांत संचारली पाहिजे. अन्नाशिवाय मानव तीस दिवसही जगू शकेल, परंतु पाण्याशिवाय? तीन दिवसदेखील कठीण! पाणी म्हणजे जीवन. आई ‘जन्म’ देते, तर नदी ‘जीवन’ देते. या अर्थाने – “माता गोदावरी आपली आईच आहे.” “जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी”.

चला तर मग, जीवनदायी माता गोदावरीचे पावित्र्य जपण्यासाठी, तिचे संवर्धन करण्यासाठी, आपण सुजाण-जागरूक नागरिक या नात्याने, येणाऱ्या नवीन पिढीसाठी “माता गोदावरी” हा एक नवीन संस्कार पेरूयात. साहित्य, संगीत, तंत्रज्ञान आणि लोकसहभाग या माध्यमांतून आपण सर्व जण मिळून माता गोदावरीचा घराघरातून जागर करूयात, माता गोदावरीचे भौगोलिक, पौराणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक तसेच व्यावहारिक महत्त्व गाऊयांत, माता गोदावरीची मनोभावे शब्दसंगीत-पूजा करूयांत, नित्य-आरती करूयांत, “गोदावरी आरती” या उपक्रमांत कर्तव्यबुद्धीने सहभागी होऊयांत.