गोदावरी : ब्रह्मगिरीची ब्रह्मवादिनी ! – लक्ष्मीकांत जोशी

दृष्ट्वा गोदा शतं पापम्।
स्पृष्ट्वा जन्मशतत्रयम्।
स्नात्वा जन्मसहस्राणि।
हन्ति गोदा कलौ युगे।इ

जिच्या केवळ दर्शनाने शंभर पाप, स्पर्शाने तिनशे पाप आणि स्नानाने कलियुगातली सहस्र पाप नाहीशी होतात !!!!
आज गंगेसमान असलेल्या गोदावरी नदीचा जन्मदिवस! माघ शुद्ध दशमीला त्र्यंबकेश्वरजवळच्या ब्रह्मगिरीतून गोदावरीचा उगम झाला. गौतम ऋषींकडून झालेल्या गोहत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी गाैतम ऋषींनी प्रदीर्घ तपश्चर्या केली आणि भगवान त्र्यंबकेश्वरांनी गौतम ऋषींना गंगा वरदान म्हणून दिली. तीच गौतमी गंगा नावाने आणि या गंगेचा प्रवाह गाईच्या अंगावरुन गेल्याने गाय जिवंत झाली म्हणून गोदावरी या नावाने ओळखली जाते. गेल्या वर्षी नाशिक येथील सुनिल खांडबहाले यांनी सुरू केलेल्या गोदावरी आरतीच्या उपक्रमात मला आमंत्रित केले होते. त्यावेळी गोदावरीविषयी व्यक्त केलेल्या भावना अशा होत्या की,

ब्रह्मगिरीची ब्रह्मवादिनी
गौतमांच्या तपश्चर्येतूनी
तू गौतमी पतितपावनी ॥
तू न केवळ एक नदी
तू पावित्र्याची परमावधी
तुझ्या दर्शनाने मन आनंदी ॥
तुझे ध्यान हेच स्नान
तुझा प्रवाह हाच पंचप्राण
तूच जीवन हीच असू दे सदोदित जाण॥

आज गोदावरीच्या प्रदूषणाविषयी सातत्याने चर्चा होत असते. परंतु हे प्रदूषण सरकारी योजनांपेक्षाही लोकभावनेतून आणि लोकदबावातून लवकर दूर होऊ शकेल. नमामि गंगेप्रमाणेच नमामि गोदेची मोहीमही प्रभावी व्हायला हवी. म्हणजेच ही गोदावरी आपले जीवन आहे ही भावना वाढली पाहिजे. आरोग्यदृष्ट्या गोदावरीचे पाणी खूपच उपकारक असल्याचे अनेक ग्रंथांमध्ये सांगितले आहे. राजनिघंटु नावाच्या ग्रंथात असा उल्लेख आहे की पित्त आणि रक्त यांचे आजार गोदावरीच्या जलाने नाहीसे होतात. हे पाणी पथ्यकर मानले जाते आणि या पाण्यामुळे भूकदेखील वाढते असा उल्लेख आहे. म्हणजे आजच्या विज्ञानयुगात आपण जी ‘वॉटर थेरपी’ म्हणतो ती या गोदावरीच्या पाण्यामुळे सहजपणे उपलब्ध होते. गोदावरीसंदर्भात अनेक धार्मिक, आध्यात्मिक उल्लेख वाचायला मिळतातच. परंतु नाशिक आणि पैठण ही दोन क्षेत्रे गोदावरीसाठी विशेष महत्त्वपूर्ण मानली गेली. कारण गोदावरीला दक्षिण गंगा म्हटले जाते आणि आजची पैठणनगरी जी पूर्वी प्रतिष्ठान नगरी म्हणून ओळखली जायची तीसुद्धा ‘दक्षिण काशी’ म्हणून मानली गेली आहे. ही तीर्थक्षेत्रे म्हणजे आजच्या विज्ञानयुगातल्या पिढीसाठी सांगायचे झाले तर एका ‘डिव्हाईन सिटी’सारखी आहेत. नाशिक परिसरात द्राक्षांचे अधिक उत्पादन होते. दुर्दैवाने तिला वाईन सिटी म्हणून प्रतिष्ठापित करण्याचे आटोकाट प्रयत्न काही मंडळींकडून सुरु आहेत. म्हणूनच गोदावरीच्या आजच्या जन्मतिथीच्या निमित्ताने गोदावरीच्या जलातले प्रदूषण दूर करीत असतानाच लोकांच्या मनातले सांस्कृतिक प्रदूषणही थांबवावे लागेल. महाराष्ट्राला लाभलेले आध्यात्मिक, सांस्कृतिक, भौगोलिक वरदान समृद्धतेचे मोठे आश्वासन आहे. गोदावरीच्या जयंतीनिमित्ताने तिलाच तिच्या जलाने मनस्वी अर्पण केलेले हे अर्घ्य !!!!

– लक्ष्मीकांत जोशी.